Sunday, October 13, 2024

दसरा

ते दिवसच वेगळे होते. 

भाद्रपदाचा ऊन पावसाचा खेळ संपता संपताच अश्विनाची चाहूल लागायची. बुचाच्या फुलांच्या झाडावरचा बहर पावसाच्या दांडगाई मुळे पायघड्या घालायला राजी व्हायचा. गगनजाई किंवा आकाशमोगरी अशा काव्यात्मक नावांनी देखील ओळखली जाणारी ही फुले सहस्त्र हातांनी सुगंधाची लयलूट करायची.


त्या धुंद वातावरणात अश्विनाचा प्रवेश अगदी अलगद व्हायचा. देवीच्या नवरात्राचे बसलेले घट, उदा-धुपाच्या वलयांनी आणि काहीशा उग्र वासाने आलेलं एक भारलेपण, सुंदर ताज्या फुलांनी सजलेली देवीची प्रसन्न तसबीर आणि सकाळ- संध्याकाळ म्हटलेली 

"अश्विन शुद्ध पक्षी अंबा बैसली सिंहासनी हो...." ही अतिशय सुरेख चालीची आरती, हे सर्वच कसं अगदी काल घडल्या सारखं वाटतं.


शाळकरी वयात आरतीचा अर्थ फारसा कळत नसला तरी त्यात वर्णन केलेल्या प्रतिपदेपासून तर दशमी पर्यंतच्या अनेक गोष्टी - देवीचा साज श्रृंगार, चौसष्ट योगिनींचा उल्लेख, जाई, जुई,शेवंतीच्या सुगंधी फुलांनी केलेली पूजा,षड्रस युक्त अन्नाचा दाखवलेला नैवेद्य, भक्तांच्या हाकेला धावून जाणारी अष्टभुजा नारायणी, दशमीला सीमोल्लंघन करून शुभं निशुंभांचा नि:पात करणारी अंबा... 

या सगळ्याची भुरळ पडलेली असायची.

रामदास स्वामींची ही आरती ‌म्हणताना मनात मांगल्याचा शिडकावा होत असणार हे आता जाणवतं.


याच दिवसात आमच्या घरापासून थोड्या अंतरावर असलेल्या बंगाली मुलांच्या शाळेच्या पटांगणावर दुर्गा पूजा प्रदर्शन भरायचं.


बंगाली समाजाने आयोजित केलेले हे प्रदर्शन पहायला खूप गर्दी होत असे. एका बाजूला दुर्गा देवीची भव्य मूर्ती असून त्या पुढच्या मोकळ्या जागेत वेगवेगळे स्टॉल लावलेले असत.


इतक्या गर्दीत कधीकधी काही मुलं आणि त्यांच्या पालकांची चुकामूक होई. मग तिथल्या आयोजकांपैकी कोणीतरी लाऊडस्पीकर वरून त्या मुलाचे नाव सांगून त्याच्या पालकांना बोलावून घेई. 


या प्रदर्शनाला जाण्याचं प्रचंड आकर्षण असल्याने आम्ही भावंडं जमेल तितक्या वेळा तिकडे जात असू. अर्थात कधी मोठे भाऊ बरोबर असायचे, कधी काका तर कधी आई-वडील.


एक गोष्ट मात्र प्रकर्षाने जाणवते की इतकी गर्दी असून कधीही कुठल्याही टोळक्याने हुल्लडबाजी, छेडखानी किंवा गोंधळ घातला नाही. आजकालच्या शीघ्रकोपी प्रवृत्ती कडे  झुकणारा समाज बघितला की या गोष्टीचं नवल वाटतं.


प्रदर्शन बघून घरी चालत येताना हातात असायचा एक कॅन्डी फ्लॉस चा अर्धा खाल्लेला गोड गुलाबी कापूस, एखादी माझं नाव कोरलेली की चेन, आणि मनात खूपसं समाधान.


नवरात्राचे नऊ दिवस भराभर संपायचे. मग यायचा दसरा. त्या दिवशी घरातील सर्व वाहने सुस्नात झाल्यावर त्यांच्यावर झेंडूच्या फुलांचे हार चढायचे व त्यांची पूजा व्हायची.

दुपारची जेवणं आटोपली की थोड्या विश्रांतीनंतर संध्याकाळची तयारी सुरू व्हायची. 


संध्याकाळी लोक सोनं द्यायला येणार असायचे. त्यांना देण्यासाठी म्हणून जवळच्या उपाहारगृहातून‌ एक खारा आणि एक गोड पदार्थ आणला जायचा. बहुतेक वेळा समोसे किंवा कचोरी आणली जाई. वेताच्या मोठ्या टोपलीत कागद पसरून त्यावर पदार्थ रचले जात. बर्फी किंवा अन्य मिठाई चे वेगळे बॉक्स असत.


संध्याकाळी साडेपाच पावणेसहा ला वडील इस्त्रीचा पांढरा कुर्ता  व धोतर नेसून तयार असत. त्यांच्या देखण्या व्यक्तिमत्त्वाला तो वेष अगदी खुलून दिसे.

आम्हीही तयार होऊन आत थांबत असू.


थोड्याच वेळात लोक यायला सुरुवात होई. हॉल मधे बाबांना सोनं देऊन झाल्यावर लगेच आम्ही खाण्याच्या बशा भरून त्यांना देत असू. थोड्याच वेळात आमचा हॉल हास्यविनोद आणि गप्पांच्या आवाजाने भरून जाई.



किती छान पध्दत आहे ही. काय नसायचे त्या भेटीत? आदर, प्रेम, जिव्हाळा, आपुलकी आणि बरंच काही. आपल्या पेक्षा वयाने मोठ्या  असलेल्या , आपल्याला गुरूस्थानी, पित्यास्थानी असलेल्या व्यक्ती चा आशीर्वाद आपल्याला लाभावा, त्याच्या सदिच्छा कायम आपल्या सोबत असाव्या आणि त्या मुळे आपल्याला एक उत्तम, उन्नत, उज्ज्वल आयुष्य लाभावे ही उत्कट इच्छा त्या सोनं देण्याच्या एका कृतीतून सामोरी यायची.


हा कार्यक्रम रात्री नऊ पर्यंत चालायचा. दुसऱ्या दिवशी पुन्हा नेहमीचे आयुष्य सुरु व्हायचे. 


पण त्या एका संध्याकाळची महती खूप मोठी होती. हे आता जाणवतं आहे.

आजच्या घटकेला सोनं देणं ही चुकीचं ठरतंय कारण आपट्याच्या झाडांची बेसुमार तोड‌ होते आहे. रस्त्यावरची गर्दी आणि दूरदूरची अंतरं, यामुळे भेटण्यावर येणाऱ्या मर्यादाही आहेतच.


पण त्याहीपेक्षा आत खोलवर कुठेतरी काट्या सारखा सलणारा एक विचार पिच्छा सोडत नाही. तो म्हणजे आपल्यातला जिव्हाळा कमी होऊन  मनावर कोरडेपणाचे थर हलके हलके चढत गेलेत का ? 


जगण्याचा संघर्ष करता करताच आयुष्याने घेतलेला वेग आपल्याला भोवंडून टाकणारा आहे.  त्या वेगात स्वतः:चा तोल सांभाळताना किती गोष्टी आपल्यातून निसटून जात आहेत याचं भान हळूहळू कमी होतंय का?


कधी अपरिहार्यता म्हणून तर कधी स्वतः चा बचाव म्हणून की कधी एखाद्या प्रसंगातून सुटका करून घ्यायची म्हणून.

उत्तरं तर शोधावीच लागणार आपल्याला. पुढील आयुष्य एका वेगळ्या स्तरावर समृद्ध झालेलं पहायचंय ना !!

त्या आदिशक्ती ला निरोप देताना काही निद्रिस्त संवेदनांना जागृती मिळून आयुष्य अधिक सुंदर आणि अर्थपूर्ण व्हावे ही प्रार्थना.


No comments:

Post a Comment