चारचाकी गाडीतल्या एसीच्या गारव्यात बसून
निघाले होते देवदर्शनाला.
रस्त्यात होती हिरवी झाडं,
निळंभोर आकाश अन्
पांढरेशुभ्र बगळे,
जणू निसर्गाची साजिरी, गोजिरी बाळे.
पण त्याच रस्त्यावर सामोरं आलं,
एक भीषण वास्तव, धुळीत बेवारस पडलेल्या
संत्र्यांच्या रूपात.
माणसानंच नाकारलेलं निसर्गाचं बंदा रुपया देणारं धन, विषण्ण झालं माझं मन.
का नव्हतं त्याचं भाग्य
परदेशाची रंगीबेरंगी
बाजारपेठ बघण्याचं ?
का नव्हतं त्यांचं भाग्य
एखाद्या देखण्या दिवाणखान्यात फ्रूटबोलमधे मिरवण्याचं ?
रस्त्याबरोबर प्रश्नही पडले मागे
मनात मात्र अशी जाणीव जागे
कधी हताशा संपेल बळीराजाची
कधी उगवेल आश्वस्त पहाट उद्याची.
