Friday, May 20, 2011

आठवांचे मोरपीस


  
पाहून हिरव्या कोंदणातील शुभ्र फुले
मन पाखरू होऊन हिंदोळ्यावर झुले
गंध भरल्या दिवसांची आज येई याद
अनंताचा फुलोर घाले मना साद

अनंताच्या फुलोराला सखी मधुमालती
जाई-जुई गोकर्णी गळ्यात गळे घालती
बकुळीची नक्षी शोभे धरित्रीला
गंधवेडी आठवण मोहवी मनाला

रातराणी बिलगली वेल्या-मोगऱ्याला
अंगावर जणू शत-तारकांचा शेला
सुमनांच्या कुपीतून सांडते अत्तर
बरसात सुवासाची अंगा-खांद्यावर

डोळ्यापुढे उभे राही मागचे अंगण
मोती-पोवळ्याची तिथे होई पखरण
इवलिशी फुले देती मोठासा आनंद
न्हाऊनिया त्यात मन होई धुंद

जुळले ते मैत्र जन्मांतरीचे
जडले ते नाते पाना-फुलांचे
कोवळीक त्याची पसरते मनभर
आठवांचे मोरपीस फिरे हळुवार.