Thursday, January 1, 2026

उबारा

अस्वस्थ मनाच्या तळाशी

खोलवर, धुमसत होता

एक निखारा 


वाट पाहत होता

एका स्फुल्लिंगाची

निबरपणाच्या जाड करड्या

आवरणाखाली


लाल केशरी रंगात फुलून 

वर झेपावणाऱ्या ज्वालेतून

कोंडलेला श्वास मोकळा करून

सिध्द करायचं होतं स्वतःचं अस्तित्व 


धगधगता अंगार बनून

दाहकतेची ओळख नव्याने पटवून

सामोरं जायचं होतं अग्निवस्त्र लेवून

इतरांच्या नजरेतील प्रश्नचिन्हांना

एकवार संपवून टाकण्यासाठी



पण अवचित कानी आली 

अभंगाची धून

वागीश्वरीला आळवणारे 

स्तवनाचे सूर

नकळत बिलगून लडिवाळपणे

झिरपले अंतरंगात, आणि

जाणिवांना गोंजारत नेऊन सोडलं प्रगल्भतेच्या उंबरठयावर 


तिथे नव्हता कुठल्याच 

उद्रेकाला थारा

सुरांच्या शीतल शिडकाव्याने

शांतवला निखारा

गर्भात त्याच्पा वसे

ठाम निश्चयाचा

एक आश्वासक उबारा....