Thursday, November 4, 2010



पाहून हिरव्या कोंदणातील शुभ्र फुले
मन पाखरू होऊन ‍हिंदोळ्यावर झुले
गंध भरल्या दिवसांची आज येई याद
अनंताचा फुलोर घाले मना साद

      मनाला साद घालणारा हा अनंताचा फुलोर  भेटणं तसं दुर्मिळच. परवा ध्यानीमनी नसताना अवचित फेसबुक वरल्या फोटोत अवतरला. आणि डोळ्यासमोर उभं राहिलं ते पावसाळ्यात सचैल न्हायलेल्या आमच्या बागेचं लोभस रूपडं.
बागेचे नि आमचे भावबंध जुळले ते आम्हाला कळायला लागल्यापासूनच. एकत्र कुटुंबात वाढताना आम्हा सख्ख्या व चुलत भावंडांच्या भावविश्वाचा एक अविभाज्य भाग म्हणजे नागपूरच्या घरासमोरची बाग. श्रावणातल्या एखाद्या सोनसकाळी आंघोळ करून काजळ-तीट केलेल्या बाळासारखी ती गोंडस दिसे.
अंगणात पाय ठेवता क्षणी नजरेला पडत ती डाव्या-उजव्या बाजूला असणारी घुमटाकृती कुंतीची दाट झुडुपं. गडद हिरव्या पानाआडून डोकावणाऱ्या मोतिया रंगाच्या कळ्या आणि फुलं होती मात्र खूप नाजूक. फुलं तोडताना जरा देखील निष्काळजीपणा केला की पाकळ्या गळून हातात यायच्या. कधी-कधी दाट फांद्यांमध्ये लपलेलं बुलबुल पक्ष्याचं घरटं व त्यात घातलेली ठिपकेदार अंडी देखील दृष्टीस पडत. ही दोन्ही झुडुपं थोडी वेडी-वाकडी वाढलेली दिसली की आमचे काका किंवा वडील बागकामाच्या मोठ्या कैचीने पुन्हा त्याला मूळ रूप देत.
कुंतीला वळसा घालून छोट्या फरसबंदी वाटेने पुढे गेल्यावर लागायचे ते विटांची महिरप असलेले लांबट वाफे. ऋतुमानाप्रमाणे लावलेल्या तेरड्याची विविधरंगी फुले मन मोहून टाकायची. त्याची टोकेरी पाने आणि फुगीर कळ्या हा आमच्यासाठी कुतूहलाचा विषय होता. कळीतून बाहेर झेपावणाऱ्या इवल्याश्या  पाकळीच्या भागावरून येणाऱ्या फुलाचा रंग अचूक सांगण्याची आमच्यात चढाओढ चालायची.
शेजारच्या आयताकृती जमिनीवर मात्र हिरव्यागार गवताचं साम्राज्य असायचं. श्री महालक्ष्मी-गणपतीच्या पूजेसाठी लागणाऱ्या दूर्वा तोडायला आम्हा बहिणींचा मुक्काम बराच वेळ तिथेच असायचा. एकवीस दुर्वांची जुडी करताना एकाच जागेतून फुटणाऱ्या तीन निमुळत्या पात्यांची एकेक दूर्वा घ्यायचा कटाक्ष असायचा. त्या नादात बरेचदा नको असलेल्या दूर्वा टाकून देताना हळहळ वाटायची.
नंतर मोर्चा वळायचा तो सुगंधी आणि बिनवासाची फुले तोडण्यासाठी. वाऱ्यावर डोलणारी लालजर्द जास्वंदीची फुलं मिळतील तेवढी गोळा केली जायची. शेजारी फुललेला कळीचा जास्वंद देखील आपल्या आगळ्या लांबट रूपामुळे आवडीचा होताच. गुलाबाची मात्र मोजकी रोपं असल्याने तीन-चार दळदार, टपोऱ्या फुलांवर समाधान मानावं लागायचं.
मागच्या अंगणात चहूबाजूंनी बहरलेल्या पारिजातकाने आपल्या स्वर्गीय अत्तराचे कुंभ रिते केले असायचे. केशर माखलेला तो गालिचा परडीत वेचताना होणारा आनंद वर्णनातीत आहे. जपून अलवार स्पर्शाने ती अगणित फुलं वेचताना आधी परड्या आणि मग जेवणाची मोठी ताटं भरून जात. एक वेगळीच अनुभूती होती ती. तो छोटासा आनंद मनभर पसरायला वेळ नाही लागायचा.
हिवाळ्यातल्या बागेचा साज थोडा वेगळा असे. तेरड्याची जागा आता शेवंती घेई व थोड्याच दिवसात पिवळ्या-पांढऱ्या फुलांनी वाफा भरून जाई. त्याच्या जोडीला असत कधी जांभळे-गुलाबी अॅस्टर,  तर कधी मोठ्या आकाराचे झीनिया व डेलिया. उंच, शेलाट्या बांध्याचे, कँडी पिंक रंगाचे व मधल्या पिवळ्या परागांमुळे उठावदार दिसणारे हॅालीहॉक खूप मोहक दिसत. सकाळी उठून बागेत फेरफटका मारताना फ्लॉक्सच्या नाजूक फुलांनी गच्च भरलेल्या वाफ्याचे दृश्य तर मी कधीच विसरू शकत नाही. जमिनीलगत वाढणारी ही छोटी रोपं म्हणजे रंगांचा खजिना होय. मखमली पोत असलेली, कातरलेली, पांढऱ्या ठिपक्यांची, नक्षीदार अशी विविध रूपात व रंगात रंगलेली फ्लॉक्सची फुले बघता क्षणी माझं मन काबीज करीत.
हिवाळा संपताना, उन्हाळ्याची चाहूल लागायची ती हवेत वाढलेल्या उष्म्याने आणि मोगऱ्याला  आलेल्या बारीक छोट्या हिरव्या कळ्यांनी. वर्षभर स्वतःच्या अस्तित्वाची फारशी दखल न देणाऱ्या मोगऱ्याच्या रोपांना, हवेतला हा बदल तरारून उठायला पुरेसा असायचा. एक दिवस कळीचं रूपांतर फुलात व्हायचं आणि आसमंतात तो एकमेवाद्वितीय दरवळ पसरायचा. बागेत मोगऱ्याचे चार-पाच प्रकार होते. वाफ्यातली फुलं पाकळ्यांच्या एका वर्तुळाची, तर कुंडीतली एकात एक अशी देठासकट दोन वर्तुळांची. हजारी मोगरा म्हणजे अनेक फुलांचा मिळून एक गुच्छ असलेला. झाडावर जागोजागी असे अनेक गुच्छ असायचे. त्याच्या जोडीला फुलायचा बटमोगरा - पण तो बिनवासाचा व थोडासा जाडजूड असल्याने काहीसा दुर्लक्षित. वेल्यामोगरा आम्हा सगळ्यांचा आवडता. भिंतीच्या आधाराने गच्चीपर्यंत चढलेला हा वेल पांढऱ्या शुभ्र फुलांनी भरून जायचा. त्याची दोन वैशिष्ट्ये म्हणजे आकाशीच्या चांदण्यांशी असणारे साधर्म्य आणि मनाला धुंद करून सोडणारा सुगंध.
उन्हाळ्यातल्या रात्री सुद्धा रातराणीच्या काहीशा उग्र वासाने गंधित होउन उठायच्या. बागेच्या एका कोपऱ्यात लावलेला मे-बॉल आपलं नाव सार्थ करत तळपत असे. अंगभर गडद लाल रंगाचे तुरे मिरवणारे हे चेंडूच्या आकाराचे फूल मोठे दिमाखदार दिसे.
बागेला पाणी घालायला एक लोखंडाची झारी असे. लहान असताना ती अवजड झारी पाण्याने भरून नेण्याची हौस होती. अर्थात त्यातलं अर्ध-अधिक पाणी नेता-नेताच सांडत असे. मग आम्ही छोट्या बादल्यांनी पाणी टाकत असू. पुढे काही वर्षांनी रबरी नळीने झाडांना पाणी घालणं सुरु केलं व आम्ही सर्वच तो आनंद मनमुराद घेऊ लागलो.
लहानपण झाडं, पानं, फुलं यांच्या सान्निध्यात गेल्याने मनावर चढलेलं समृध्दीचं लेणं आज निरखून पाहताना एका अतीव आनंदाची, समाधानाची जाणीव होते. वडीलधाऱ्यांनी अतिशय अकृत्रिमपणे पुढे ठेवलेला हा अनुभव आम्हा भावंडांना कित्त्येक पटींनी श्रीमंत करून गेला हे निश्चित.