Wednesday, April 17, 2024

रामनवमी



श्यामल वर्णाच्या रघुराया

मर्यादा पुरुषोत्तम तू

सुर-नरांत उत्तम उन्नत सुंदर

त्यांचा आविष्कार तू


चैत्र शुद्ध नवमीचा जेव्हा

माध्यान्हीचा प्रहर जाहला

तेजोनिधी तो तळपत वदला

कौसल्येचा राम जन्मला


अयोध्येच्या राजमहाली 

दुडुदुडु धावे बाळ जसा

पाहुनी रूप ते अवखळ लोभस

कृतकृत्य होई राणीवसा 


धरिला हट्ट राजपुत्राने

चंद्र हवा मज खेळायाला

बालहट्ट तो पुरवी माता

आरशात दाविले प्रतिबिंबाला


दिवस सरले रात्री सरल्या

सरले बाल वय कुमारा़ंचे

अस्त्र शस्त्र पारंगत होऊनी 

लाभले आशीष मुनिवरांचे


जाता स्वयंवरा मिथिलेला

सहज पेलले शिवशस्त्राला

मुग्ध जानकी दोन करांनी

अर्पिते वरमाला तुजला


सौख्य नांदते राजमहाली

जनताही सुखी असे

मुकुट चढावा तुझ्या शिरी

मनीषा ही पित्याची असे


कैकेयी माता अति  कोपली 

म्हणे नाथा करा वचनपूर्ती

तुला करावे वनवासी

अन् तिच्या भरताला नृपती


शांत संयमी रघुराया तू 

मंद स्मित करुनी

सहज निघाला वनवासाला

राज वैभव त्यागुनी


देह कष्टला, देह श्रमला

कंदमुळांचे भोजन सजले

सौमित्र तथा जानकी सवे

पर्णकुटीत जीवन वसले


त्या सुखाला दृष्ट लागली

मायावी गोसावी प्रकटला

कपटाने करून जानकी हरण

लंकेश सत्वर पुढे निघाला


पशुपक्षी अन् चराचर सृष्टी

साह्य कराया आली तुजला

पवनपुत्र अन् मित्रगणांनी

समुद्रसेतू तसा निर्मिला


युध्द पेटले रणांगणावर

रुधिर शिंपले त्या धरेवर

लंकेश पडला धारातिर्थी 

तू तर संयमाची मूर्ती


गुढ्या तोरणे उभारलेली

फुलवेलींनी सजली नगरी

मुकुट चढला तुझ्या शिरी अन्

रामराज्य आले भूवरी



रामनवमी 

17th April 2024