युगानुयुगे लोटली
त्या अद्भुत क्षणाला
बंदिस्त कोठडीत जेव्हा
तुझा जन्म झाला
कैक वेळा ऐकली
रे , तुझी जन्मगाथा
परी भूल नाही लोपली
रे , श्रवणून ती कथा
तुला जोजवाया आल्या
सहस्त्र श्रावणधारा
संगे घेऊन सौदामिनी
अन् उधाणलेला वारा
कालिंदी झेपावत येई
तुझ्या चरणस्पर्शाला
वाट मोकळी करून देई
त्या वत्सल पित्याला
नंदघरी ती निजली माता
कुशीत योगमाया
तात उभे धरून हृदयी
तुझीच शामल काया
दाबून उरी कल्लोळ
संमिश्र भावनांचा
ठेवा अमूल्य सोपवून
पथ धरिला मथुरेचा
गोकुळ सारे मोहरले
पाहून साजिरा तान्हा
लडिवाळ मुग्ध ते रूप
तूच कृष्ण तूच कान्हा
सारी तुझीच किमया
लीला म्हणू की खेळ
चराचरात व्यापलेला
तू श्याम तू घननीळ....
Medhavini
30th August 2021