Saturday, October 28, 2023

कोजागरी

मावळतीच्या जेव्हा
सांजावल्या दिशा
हलकेच पदन्यास करीत
ओठंगली ही निशा
रुमझुम पैंजण नाद 
तिच्या अलगद पावलांचा
 विसावतो अंतरंगात
धूसर सावल्यांच्या

चांदणचुरा विखुरला
झगमगतो नीलम शेला
अगणित स्फटिक फुलांचा 
जणू कशिदा उमटविला
शरदाच्या शीतल लहरी
सहज स्पर्शून गेल्या, अन्
रजनीच्या कायेवरती
हा कसला काटा फुलला

डौलात उतरला हासत
तो उमदा शर्वरीनाथ
अन् रेखल्या प्रकाशवाटा 
नभाच्या अंगणात
मग निशेच्या गालावरचा
तो सलज्ज केशरसाज
चषकातील शुभ्र दुधात
प्रतिबिंबित होई आज...... 

No comments:

Post a Comment