Sunday, July 9, 2023

चैत्रातील नि:श्वास

   जीए कुलकर्णी यांची *चैत्र* ही कथा मी पहिल्यांदा वाचली ती माझ्या मुलाच्या पाठ्यपुस्तकात. त्याला धडा समजावून देताना माझ्याही नकळत मी त्यात गुंतत गेले. ही कथा मनात इतकी खोलवर जाऊन बसली की पुढची कित्येक वर्षे चैत्र म्हटला की पाठोपाठ याची आठवण अलगदपणे वर यायची.     

 मुळात ज्या विषया भोवती ही कथा गुंफलेली आहे तो विषय तमाम मराठी भगिनींच्या अतिशय जिव्हाळ्याचा. चैत्रगौरीचं हळदीकुंकू हे कथा लिहिलेल्या काळात घराघरात होत असे. एरवी हळदीकुंकू हे जरी फक्त बायकांचे  असले तरी मदतीच्या बाबतीत चैत्रातले हळदीकुंकू या नियमाला अपवाद ठरे. घरातील सर्व पुरुष मंडळी आणि लहान मुले सुध्दा आपापल्या परीने मदत करायला पुढे होत. 

या कथेत लेखकाने एका स्त्री चं भावविश्व, तिची हौस-मौज, तिचा कणखरपणा आणि त्याचबरोबर तिची क्षमाशीलता या सर्व गोष्टींचे अतिशय सुंदर चित्रण केले आहे. यातील प्रत्येक पात्र इतके खरेखुरे उतरले आहे की ही साधी कथा न वाटता आपल्या डोळ्यासमोर सगळे घडते आहे असे वाटते. 
रखमाचे प्रत्येक आळीत, गल्लीत व घराबाहेर जाऊन ओरडून हळदीकुंकवाचे निमंत्रण देणे ही त्या काळची लहान गावातील पध्दत खूपच वेगळी वाटली पण त्याच बरोबर रखमाच्या दृष्टीने बघायला जावे तर खूपच सोयीची. 

जीएंची लेखणी वातावरण निर्मिती करण्यात किती सरस होती हे हळदीकुंकवाची तयारी करण्याची बायकांची लगबग बघून सहज लक्षात येते. त्यांचे ते रेशमी लुगडी, पैठण्यांना ऊन दाखवणे, छोट्या मोठ्या दागिन्यांना सोनाराकडून उजळवून आणणे, नथी-कुड्या स्वच्छ करणे वगैरे गोष्टी आपली उत्सुकता वाढवतात. 

गावातलं बडं प्रस्थ असलेल्या नाईकांकडे हळदीकुंकवाला गेल्यावर राजूच्या आईचा झालेला अपमान दुखवून जातो.  " मूठभर हरभऱ्यासाठी सारखे कशाला यायचे " हे नाईक बाईने सर्वांसमोर उच्चारलेले अपमानास्पद शब्द राजूच्या आईच्या जिव्हारी लागतात. पण आपला संयम व आब राखून ती या प्रसंगाला सामोरी जाते. 
एखाद्या बाईने दुसऱ्या बाईचा अपमान करणे ही सर्वसामान्य गोष्ट असली तरी ती जेव्हा आर्थिक तफावत दाखवणारी असते तेव्हा ती जास्त बोचरी आणि मन विदीर्ण करणारी असते.

 अंतरात उफाळून येणारे कढ तिला पोळून काढण्याच्या क्षमतेचे असूनही ती विचारी  आई त्यातून बाहेर पडते.  स्वत:च्या घरी गाव-हळदीकुंकवाचा दिमाखदार आणि मोठा समारंभ करून ही घटना तिच्यापुरती संपवण्याचे ती ठरवते. यात सूडाची भावना नसते, दुसऱ्याचा अपमान करायचा नसतो. असते ती फक्त "स्व" ची जपणूक, तीही अतिशय संयतपणे. आम्ही त्यातले नाही हेच फक्त राजूच्या आईला नाईक बाईला दाखवून द्यायचे असते. 

ठरल्याप्रमाणे राजूच्या घरी तयारी सुरु होते. आई राजूच्या दादांना स्वतः चे दोन-तीन लहानमोठे दागिने देते आणि ते गहाण ठेवून त्याचे पैसे आणायला सांगते. दादा ते ठेवून घेतात. त्यावेळेच्या त्यांच्या संवादातून परस्परांवरचा विश्वास खूप सुंदर तऱ्हेने समोर येतो. आपसात सामंजस्य असले म्हणजे कठीण प्रसंगातून बाहेर पडण्याचे बळ मिळते हेच यातून स्पष्ट होते. मानवी स्वभावाचे चित्रण किती वेगवेगळ्या कोनातून केले आहे जीएंनी  आणि म्हणूनच त्यांचं लिखाण तितक्याच ताकदीने भिडतेही आपल्या मनाला. 

हळदीकुंकवाची सर्व सिद्धता होते. राजूच्या घरात मोठे जाजम आणले जाते. रांगोळ्या काढल्या जातात. मोठे पिंप भरून पन्हे केले जाते. ही पण वातावरण निर्मिती अप्रतिम आहे. हळूहळू बायका यायला लागतात. आईचे लक्ष मात्र नाईक बाई केव्हा येते या कडे असते. शेवटी एकदाच्या नाईक बाई आणि नाईक काकू येतात. त्यांना पाहून आईचे डोळे आरशासारखे स्वच्छ होतात आणि चेहरा चिंचपाण्याने  घासलेल्य गौरी सारखा उजळतो. किती सुंदर तुलना आहे ही. 
राजूच्या मनातली त्याच्या आई ची प्रतिमा ही मांगल्याचे प्रतीक असलेल्या चैत्रगौरीशी साधर्म्य सांगते. खूपच भावणारी आणि वाचकांचे मन सहज काबीज करणारी. राजूची आई दोघींना हळदकुंकू देते, ओटी भरते. समारंभाचा थाटमाट पाहून नाईक बाईचा चेहरा बदलतो व ती सारा वेळ गप्प बसून असते. नाईक काकू मात्र आत जाऊन राजूच्या आईची झाल्या प्रकाराबद्दल माफी मागते. राजूची आई मोठ्या मनाने सर्व विसरल्याचे सांगते. पण आपल्या लहान मुलाच्या मनावर उमटलेला चरा कसा पुसल्या जाणार असा तिला प्रश्न पडतो. इतके सगळे होऊन सुध्दा राजूची आई नाईक बाईचा अपमान करत नाही. फक्त तिला तिची चूक कळावी म्हणून हळदीकुंकवाचा घाट घालते. आणि ते तसंच होतही. मनोमन खजील झालेल्या नाईक बाईचे शरमिंदेपण कोणालाच कळत नाही. याच प्रसंगातून राजूच्या आईच्या मनाचा मोठेपणा अधोरेखित होतो व खूप परिणामकारक होतो.

 पुढे वेगळेच काही घडते. कथेत आणि माझ्या आकलनात सुध्दा. माझ्या मुलाच्या पाठ्यपुस्तकात हळदीकुंकू संपेपर्यंतच धडा होता. कालांतराने ही कथा जेव्हा परत वाचनात आली तेव्हा कथेचा शेवट वाचून मन सुन्न झाले. 
पुढील वर्षी पुन्हा चैत्र येतो आणि एके दिवशी नाईक काकू स्वतः राजूच्या आईला हळदीकुंकवाचं आमंत्रण द्यायला येते. आमंत्रणाची सुरुवातच त्यांच्या घरापासून करते. पण मधल्या काळात राजूच्या दादांचे निधन झाले असते. म्हणून आई राजूला पुढे करते आणि ती न्हाणीघरात आहे असे सांगायला सांगते. नाईक काकू गेल्यावर राजूला आई सांगते, "एक लक्षात ठेव राजू. चिखलातून जायची पाळी आलीच, तर घट्ट मनानं कोरड्या डोळ्यांनी चालत जा. मात्र आपला चिखल इतरांवर उडणार नाही हे बघत जा. "

ही कथा संपता-संपताच त्यातील असीम कारुण्य भिडतं मनाला. चैत्र महिना म्हणजे नवतेचा उत्सव. निसर्गाच्या फुलण्यातली कोवळीक आपल्याही मनात फुलू दे अशी मनीषा बाळगण्याचा हा महिना.अशा चैत्र महिन्यात सर्वांचं चांगलं चिंतणाऱ्या आईला,ती कथेतील एक पात्र असली तरीही,  मोठंच दु:ख पचवावे लागते आहे हे मला खूपच करुण वाटते. यातच कथा किती प्रभावी ठरली आहे हे जाणवते. त्याच बरोबर मनात खोलवर उमटते ते राजूच्या आईचे वागणे. आपल्यामुळे दुसऱ्याला कसलाही त्रास होऊ नये हे ती सांगते आणि वागतेही तसेच. ती नाईक काकू ला मुद्दाम सामोरी जात नाही कारण आपल्या पतीच्या मृत्यूसाठी तिला जबाबदार धरल्या गेले असते व यासाठी नाईक काकू ला आयुष्यभर अपराधीपणाचे ओझे वाहत जगावे लागले असते. आपले वैधव्य हा नाईक काकू साठी अपशकुन ठरू शकेल याची जाणीव ठेवून ती बाहेर जाणे टाळते. 
एकुणात ही कथा तिच्या मुख्य पात्राच्या ठायी असलेल्या वैचारिक प्रगल्भतेचा उत्कृष्ट नमुना आहे. माणसातील चांगुलपणा सहजगत्या अधोरेखित करणारी ही जीएंची कथा माझी अतिशय आवडती आहे. 

No comments:

Post a Comment