या वर्षीची जागतिक महिला दिनाची संध्याकाळ माझ्यासाठी खूपच खास होती. वास्तविक दर वर्षी या दिवशी फार वेगळं असं काहीच घडत नाही. मैत्रिणी, नातेवाईक यांना शुभेच्छा देण्या पलीकडे तर काहीच नाही.
बहिणीला तिच्या वाढदिवसानिमित्त फोन होतो.थोड्याफार गप्पा होतात, एका जवळच्या मैत्रिणीच्या मुलीला वाढदिवसाच्या शुभेच्छा व्हॉट्स अॅप वर पाठवल्या जातात. एवढे होत नाही तर सकाळची कामे खुणावत असल्याने ट्विंकल खन्ना चा लेख किंवा महिला सबलीकरणावरचे लोकांचे भाष्य हे सर्व "वाचू सावकाश" म्हणून बाजूला सारले जातात.
पण या वर्षी मात्र सात मार्च ला पेपर मधल्या एका बातमीने माझे लक्ष वेधून घेतले. काही वर्षांपूर्वी पुण्यात कोथरूड येथे श्री. संजय भास्कर जोशी यांनी सुरू केलेल्या "पुस्तक पेठ" या पुस्तकांच्या नाविन्यपूर्ण अशा दालनाबद्दल ती बातमी होती.
महिला दिनानिमित्त सर्व नामवंत लेखिकांच्या पुस्तकांच्या खरेदीवरच्या किमतीत चाळीस टक्के सूट दिली जाईल असे म्हटले होते.
पुस्तक पेठ सुरू झाल्यापासूनच त्याबद्दल कुतूहल जागृत झालं होतं. एकदा भेट द्यायलाच हवी असं कितीदा तरी मनात येऊन गेलं. पण प्राधान्य क्रमात बऱ्याच वरच्या क्रमांकावर असलेली ही इच्छा हळूहळू कधी खाली घसरत गेली हे मला कळलेही नाही.
शाळेच्या व्यस्त दिनक्रमात, घरचे-दारचे बघण्यात दिवस निघून जायचे व मधेच आठवण आली तरी ती वेळ सोयीची नसायची. बघू नंतर कधीतरी असं स्वत:ला सांगत असताना दोन वर्षापूर्वी लॉकडाऊन सुरू झाला आणि हळूहळू पुस्तक पेठ हे नाव मन:पटलावरून धूसर होत गेले.
खरं तर कधीतरी वेळ काढून जाणे सहज शक्य झाले असते. पण काही गोष्टी आवर्जून केल्या गेल्या नाहीत तर त्या होतच नाहीत नं तेच या बाबतीत झालं. पण आता मात्र जायचंच असं मनाशी पक्कं करत आठ तारखेला संध्याकाळी जायचे ठरविले.
पौड रस्त्याजवळ शिक्षकनगर भागात असलेले पुस्तक पेठ एका लहानशा घरात वसलेले आहे. बाहेर एक मोठेसे तुळशी वृंदावन. समोरच्या दोन पायऱ्या चढून आत गेल्यावर श्री. जोशी यांनी प्रसन्न मुद्रेने केलेले स्वागत. दोन्ही बाजूच्या भिंतीवर कविवर्य बोरकर आणि कवी ग्रेस यांच्या कवितांच्या ओळी छापलेले, कलात्मक रंगसंगती साधलेले बोर्ड्स. आणि सभोवती नीटनेटकी लावलेली असंख्य नवी कोरी पुस्तके. अगदी हरखून गेला जीव माझा.
मराठी पुस्तकांचे असे सान्निध्य कितीतरी वर्षांनी अनुभवत होते मी. अवतीभवती फक्त मराठी पुस्तके. अनेक प्रतिथयश लेखक-लेखिकांंची पुस्तके समोर दिसत होती.
अनेक वेळा पुस्तकांच्या दुकानात जाऊन किंवा पुस्तक प्रदर्शनांना भेटी देऊन मिळणारा आनंद वेगळा आणि ही अनुभूती पूर्ण वेगळी होती.
लहानपणापासून इंग्रजी आणि मराठी या दोन्ही भाषांवर सारखंच प्रेम असल्याने आणि कुटुंबातील सगळेजण वाचन प्रेमी असल्याने घरात ढीगभर पुस्तकं असायची. त्याच बरोबर रीडर्स डायजेस्ट, इलस्ट्रेटेड वीकली, धर्मयुग, आनंद, किशोर यांचा ही रतीब असायचा. अमर चित्रकथा, चांदोबा, इंद्रजाल कॉमिक्स तर होतेच अवतीभवती. संस्कृत भाषेचा दांडगा व्यासंग असलेल्या आजोबांच्या कपाटात अमरकोशाचे खंड व त्यांची अनेक पुस्तके होती.
पण मला भुरळ पाडली ती आईच्या पुस्तकांच्या कपाटाने. कवयित्री असलेल्या आईचा पुस्तकांचा संग्रह खूप मोठा होता. ब्राऊन पेपरचे कव्हर घालून पहिल्या पानावर तिच्या सुरेख हस्ताक्षरात नाव लिहिलेले असे. उत्तमोत्तम कादंबऱ्या, कथा आणि कवितासंग्रह, आत्मचरित्रे, काही तिची आवडती इंग्रजी पुस्तके असा खजिनाच होता आमच्यासमोर.
तसेच ललित, माणूस चे अंक ही असायचे.
अर्थात लहान वयात त्यातलं बरंचसं कळायचंही नाही पण तशी वाचायची मुभा असल्यानेच आम्ही सगळी भावंडे वाचन वेडे झालो.
आई बाबांबरोबर बरेचदा नागपूर च्या " साहित्य प्रसार केंद्र " या मराठी पुस्तकांच्या दुकानात जाणे व्हायचे. थोडीफार खरेदी व्हायचीच. दर वर्षी शाळेची पुस्तकं घ्यायला ओल्ड वर्ल्ड चार्म असलेल्या "द वेस्टर्न बुक डेपो" या सदर मधल्या दुकानात जायला अतिशय आवडायचे. बाबांची अर्थातच तिथे एखाद्या डिक्शनरी ची खरेदी ठरलेली असायची. आमच्यावर मराठी व इंग्रजी वाचनाचे संस्कार होण्यत या दुकानांचा ही वाटा आहेच.
तर हे सगळं असूनही मनापासून आवडलेलं पुस्तक विकत घेणं हे माझ्या बाबतीत क्वचितच घडतं. त्यापेक्षा वाचनालयातून हवी ती पुस्तकं आणून वाचणं हे जास्त सोपं आणि सोयीचं होतं. कारण इतकी पुस्तकं घेतली तर जागेचा मोठाच प्रश्न उभा राहील.
काही वर्षांपूर्वी पुण्यात कॅम्प भागात उत्तमोत्तम पुस्तकांसाठी प्रसिद्ध असलेले मॅनीज हे दुकान बंद पडायच्या आधी बरीचशी पुस्तकं सवलतीच्या दरात विकली जातील असं समजलं. मुलांनाही वाचनाची आवड असल्याने आम्हा सगळ्यांचं तिकडे जाणं ओघाने आलंच. पुस्तकं चाळता - चाळता "द कश्मीर शॉल " हे रोझी थॉमस चं अप्रतिम पुस्तक सापडलं. स्वातंत्र्यपूर्व काळातील काश्मीर ची पार्श्वभूमी असलेल्या गोष्टीतील नायिका,वेल्श मिशनरी म्हणून भारतात स्थायिक झालेल्या तिच्या आजी बद्दल माहिती काढायला भारतात येते. तिच्या आजी कडे असलेल्या पश्मिना शालीचं मूळ ही तिला शोधायचं असतं. भारतात आल्यावर तिचा प्रवास अतिशय रोमांचकारी असतो. हे सर्वच मला खूप भावले व मी ते पुस्तक विकत घेतले.
भारतीय पार्श्वभूमी वर परदेशी लेखकांनी बेतलेल्या कथा मला नेहमीच आकर्षित करतात. एम एम के चं "द फार पॅव्हिलियन्स" हे त्यापैकीच एक.
मुलं लहान असताना त्यांच्यासाठी एनिड ब्लायटन चं " द सिक्स कझिन्स" हे पुस्तक आवर्जून घेतलं. एका प्रदर्शनात त्याची ओम्निबस आवृत्ती मिळाली होती. हे लहान मुलांचे असूनही माझा त्यातला रस थोडाही कमी झालेला नाही.
पुण्यात क्रॉसवर्ड नुकतच सुरु झाल्यावर जंगली महाराज रस्त्यावरच्या दुकानात पाऊल ठेवल्यावर खूप आनंद झाला होता. पण हळूहळू कालांतराने या दुकानांमधला एक प्रकारचा अलिप्त भाव मनाला वेढून टाकायला लागला. एक थंड कोरडेपणा ज्यामुळे पुस्तक खरेदीतील आनंद जरा कमीच व्हायला लागला.
पुस्तक पेठेत मात्र एकाएकी घरी आल्यासारखं वाटलं. एक उबदार आपलेपणा जो एखाद्या शाली सारखा आपसूक लपेटला गेला माझ्यावर आणि जणू म्हणत होता " किती दिवसांनी आलीस गं! आम्ही वाट बघत होतो ना! "
पुस्तक पेठेत त्या दिवशी मला असे जाणवून गेले की आपण कित्येक दिवसात छानसे मराठी पुस्तक वाचले नाही. समोर होते एलकुंचवार, दुर्गाबाई भागवत, आशा बगे, सानिया, गौरी देशपांडे व आणखी कितीतरी. सगळी पुस्तकं माझं लक्ष वेधून घेण्यासाठी जणू हाका मारत होती मला. "अगं हे बघ, मी इथे आहे. मला पाहिलंस का? तुला आवडेल मला वाचायला. "
मला काय करावे कळेना. सगळीच आवडीची आणि सगळीच हवीहवीशी वाटणारी. शेवटी मोनिका गजेंद्रगडकर यांचा "भूप" हा दीर्घकथा संग्रह विकत घेतला आणि विजयी वीरांगनेच्या थाटात घरी परतले.
आपलं जगणं नाना व्यवधानांनी इतकं बांधलं गेलं असतं की काही काही गोष्टी आपल्य लक्षात यायला सुध्दा वेळ लागतो. एखाद्या गोष्टीची उणीव भासते ती देखील ती बाब समोर आल्यावरच. ते होईपर्यंत आपण त्या बाबतीत अनभिज्ञ असतो आणि रोजचं आयुष्य सुरू राहतं. पण कधीतरी अनपेक्षितपणे समोर आलेल्या आनंदाने सुखावलेलं मन सांगत असतं, "अगं याचीच वाट बघत होतीस नं तू नेणीवेत ! आता जप हे सुख. जाणीवपूर्वक."
व्वा,कित्ती सुरेख लिहिलं आहे हे, खूप सहजसुंदर लिखाण.
ReplyDeleteThank you so much. Your name appears as Unknown so please let me know. Do let me know on whatsApp whenever you decide to comment next time. Truly regret the inconvenience.
DeleteHello Medhavini!
ReplyDeleteRead your article just now and could not stop in congratulating you!You have such an amazing and beautiful talent!Highly impressed by the rich and beautiful vocabulary!Kudos to you dear,looking forward to read your next blog!
Thank you very much. Please let me know on whatsApp when you decide to comment on the blog as your name appears as Unknown. Thanks again.
DeleteSo beautifully penned and articulates the feelings of every single book lover like me! Six Cousins At Mistletoe Farm is one of my FAVORITE books by Enid Blyton followed by Six Couisns Again! Once, while shopping at a second hand book store in Pune Camp when I was in 4th grade,I saw Six Cousins Again lying on the counter. Having just finished part 1, I was about to pounce on it when I realized someone was in the process of buying it!I can still feel how heartbroken I was...it was only a couple of years later that we found a new copy of part 2 and promptly bought it!
ReplyDeleteThank you so much Anupama. I can imagine what you must have gone through. Six Cousins will always be close to my heart. Thank you for reading and commenting.
Deleteखूप सुंदर लिहिलंय मेधा सगळं डोळ्यासमोर उभा राहिलं साहित्य प्रसार केंद्र वेस्टर्न बुक डेपो सदर आणि मुख्य कमला त्याचे पुस्तक कविता आणि खरंच त्या पुस्तकांना तिने लावलेलं कव्हर व तिच्या हस्ताक्षरात लिहिलेले सगळं डोळ्यासमोर उभा राहिलं मस्त वाटलं वाचून
DeleteThank you so much for your appreciation.
DeleteIt helped me recall the good old days and the 'memorable landmarks'of Nagpur. Very nice read, at some places i had to take out my marathi dictionary !
ReplyDeleteThank you so much for reading and commenting Abhay. Glad to know you liked it.
Delete