Tuesday, December 22, 2020

बहावा


बहावा


बहरलेलं झाड



काही महिन्यापूर्वीची गोष्ट. एका दुपारी जेवणाची तयारी करत असताना किचनच्या खिडकी बाहेर हालचाल जाणवली. पाहिलं तर एक माणूस माझ्या लाडक्या बहाव्याच्या वाळलेल्या फांद्या तोडत होता. हो,माझाच तर होता तो. सोसायटीचा असला तरी मनोमन माझाच मानत होते मी त्याला. दोनच मिनिटात झाडं कापायच्या करवतीच्या आवाजाने मी खिडकीकडे धावले. आणि माझ्या डोळ्यासमोर तो खाली कोसळला.

थोडा वेळ सुन्न होऊन तिथेच उभी राहिले,

मनावर झालेला आघात झेलत.

पण घर जेवणासाठी ताटकळलं होतं म्हणून मला दु:ख गुंडाळून ठेवणं भाग होतं.  तशी सवय ही असतेच मनाला, सल लपवण्याची अथवा चरा लिंपण्याची. 


तशी त्याची आणि माझी ओळख खूप जुनी 

 अशी नव्हतीच. शाळेतल्या धड्यात तर त्याची पाने, फुले व बिया विषारी असून त्या जनावरांसाठी योग्य नाहीत हेच वाचलेलं आठवत होतं.शिवाय विदर्भात त्याची लागवड होत नसल्याने मोठं होताना त्याची संगत कधीच नव्हती. 


पुण्यात मात्र उन्हाळ्यात गुलमोहोराच्या जोडीनं हा कुठे-कुठे फुललेला दिसायचा. कधी एकांडा शिलेदार  तर कधी बऱ्याच जणांच्या सोबतीने उभा असायचा.तेव्हा तर मला त्याचं मराठी नाव देखील माहीत नव्हते. 

लॅबरनम या त्याच्या इंग्रजी नावाशीच तेव्हढी ओळख होती. 


आम्ही कोथरूडला रहायला आल्यावर आमच्या सोसायटीची बाग हळूहळू फुलायला लागली. मधल्या मोकळ्या जागेत बरीच झाडं लावली होती. ती ही छान वाढायला लागली.

त्यातलंच एक झाड आमच्या इमारतीच्या समोर वाढत होतं.

 सुरुवातीची काही वर्ष आमच्यात काहीच देवाणघेवाण नव्हती. काही निर्माण व्हायला काही तरी रुजावं लागतं ना मनात. एक आपलेपणा, एक जिव्हाळा असं काही नव्हतंच. थोडक्यात काय तर काही कनेक्टच नव्हता. 

 अशीच काही वर्ष गेली, मी ही संसारात पूर्ण गुंतले.  घरातल्या  लहानमोठ्या मंडळींची आजारपणं, मुलांच्या शाळा, अभ्यास, परीक्षा व माझी शाळेतली नोकरी यांनी माझा पूर्ण ताबा घेतला. समोरच्या झाडाकडे बघायला कारण नव्हतं आणि वेळही  नव्हता. दिवस पुढे सरकले, ऋतु बदलत राहिले तसं समोरचं, पांढरं खोड असलेलं झाडही फांद्यांनी,पानांनी गच्च भरलं. पण माझ्यासाठी अद्यापही ते एक झाडच होतं. फरक इतकाच होता की आता ते इतकं वाढलं की त्यामुळेआमच्या किचनला छान प्रायव्हसी मिळाली.

 

माझ्या स्वयंपाकाच्या ओट्यासमोरची खिडकी is my window to the world, both literally and figuratively. तिथून दिसणारे  निसर्गाचे नित्य नवे आविष्कार मन टिपत असतं.  कधी निळंभोर आकाश, तर

कधी  ढगांचा झाकोळ व पावसाची नानाविध रूपं, कधी जादुई संधिप्रकाश तर कधी पहाटेच्या अंधारात अस्ताला जाणारा पौर्णिमेचा चंद्र. हे सर्व माझ्यासाठी न संपणाऱ्या आनंदाचे स्रोत आहेत.


तर अशाच एका मार्च महिन्यातल्या सकाळी सहज खिडकीबाहेर पाहिलं तर झाड नेहेमीचंच होतं पण आज त्यावर फुलं उमलली होती.   हिरव्या पानांच्या गर्दीत टोकाशी निमुळत्या होत जाणाऱ्या दांड्यावर ठराविक अंतरावर फुललेली सुरेख पिवळी फुलं नजरेला खुणावत होती. छोटी -छोटी पिवळी द्राक्षंच लागली आहेत असं वाटत होतं. किती मोहक दिसत होती ती रंगसंगती.

मग रोज झाडाकडे बघण्याचा नादच लागला. 

फुलांकडे बघून मन सुखावत होतं खरं. 


कसं असतं ना आपल्या मनाचं ! एखादी गोष्ट आवडली की त्याबद्दल किती माहिती करून घेऊ आणि किती नाही असं होतं. त्यामुळे विकिपीडियावर लॅबरनमची माहिती शोधून वाचली. तेव्हा कळलं की मराठीतला तो बहावा आणि हिंदी / उर्दू मधला अमलतास.


 विशेषत: अमलताश या नावाच्या प्रेमातच पडले. ज्येष्ठ अरण्य अभ्यासक आणि वनतज्ज्ञ, श्री. मारुती चितमपल्ली यांच्या पुस्तकांमधून बहावा व अमलतास हे दोन्ही भेटले  पण स्वतःच्या प्रेमात पाडणारा अमलताश मात्र भेटला डॉ. सुप्रिया दीक्षित यांच्या पुस्तकाच्या नावामधून. काही शब्दांमध्ये, नावांमधेच अशी मोहिनी असते की तिची आपल्याही नकळत भुरळ पडते व आपल्या मनात त्यांना एक अढळ स्थान मिळतं. तसंच अमलताश म्हटलं की एक धीरगंभीर तरीही मृदू वाटणारा व चवऱ्या ढाळणारा वृक्ष डोळ्यासमोर येतो. त्या नावाभोवतीच शांत सौंदर्याचं एक वलय जाणवतं.

 


बघता- बघता उन्हाळा संपून पावसाळा सुरू झाला. बहाव्यावर लांबचलांब, हिरव्या रंगाच्या शेंगा लटकू लागल्या.अर्थात त्या खायला पक्षी येणार नव्हतेच. त्या खाण्यास अयोग्य असल्या तरी त्यांच्या औषधी गुणधर्मामुळे उपयुक्त आहेत असे वाचनात आले होते.


 नाही म्हणायला एका पावसाळी संध्याकाळी कावळ्याची एक जोडी एका फांदीवर येऊन बसली. अगदी चिडीचूप, आवाज न करता बसली होती दोघं.संध्याकाळ गडद व्हायला लागली आणि थोड्याच वेळात काळ्यामिट्ट अंधारात ती दोघं  दिसेनाशी झाली. असं आठवडाभर सुरू होतं. त्यानंतर ते यायचे बंद झाले. बहाव्याचे आणि त्यांचे आठवडाभराचेच ऋणानुबंध असतील कदाचित.


 हिवाळ्याचे चार महिने उलटले आणि तोवर अगदीच चारचौघांसारखं दिसणारं झाड हळूहळू आपलं रंगरूप बदलू लागलं. हलक्या पोपटी रंगाच्या पानांमधून इथे-तिथे डोकावणारे पिवळे तुरे आता सगळीकडे हसत मिरवत होते. सूर्यापासून मिळालेली ऊर्जा आणि तेज आकंठ पिऊन जणू अंगोपांगी मोहरून आला होता बहावा. केव्हढा तो कायापालट ! 

 अन् मग एक दिवस खिडकीबाहेर लक्ष जाताच एक मुलायम रेशमी सोनसळी महावस्त्र सळसळत असलेलं दिसलं. बहाव्याचं संपूर्ण झाड फुलांनी बहरून आलं होतं.  नजर ठरत नव्हती त्या दृष्यावर ! बरं रंग तरी किती सुंदर असावा ? पिवळ्या रंगाच्या अनेकानेक छटांपैकी नेमक्या एका अतिशय मोहक, मनभावन आणि तेजस्वी रंगावर विधात्याचा कुंचला येऊन स्थिरावला  होता.



माझ्या खिडकीबाहेरचं अवकाश त्या  प्रकाशफुलांनी जसं पूर्ण व्यापलं होतं तसंच माझं मनही. रोजच्या जगण्यात बोथट झालेल्या संवेदना आणि माणसातलं  माणूसपण पुन्हा जागवण्याची एक प्रभावी शक्ती निसर्गात आहे हे प्रकर्षाने जाणवून गेलं.


तो सोनेरी झळाळ रोज उठून बघताना माझी सकाळ तर प्रसन्न व्हायची पण दुपारचं चित्र वेगळं असायचं. एकीकडे चैत्र-वैशाखातलं अंग भाजून काढणारं ऊन आणि दुसरीकडे बहाव्याच्या फुलांचे घोस. ते दोघेही हातमिळवणी करून असे काही तळपायचे की पाहणाऱ्याचे डोळे दिपले नाहीत तर नवल.तो नजाराच काही वेगळा होता.


काही दिवसांनी फुलांचा रंग फिका पडून , बहर संपल्याच्या खुणा दिसू लागल्या. पण फुलांची आणि आमची दर वर्षीची भेट आता ठरून गेली होती व नित्यनेमाने ती व्हायची. असेच दिवस जात राहिले आणि एक दिवस बहाव्याच्या फांद्या,  वरून गेलेल्या विजेच्या तारांजवळ आल्याने  कापून टाकाव्या असे सोसायटीने ठरवून टाकले व ते लगेच अमलात आणले. माझा बहावा आता अगदीच ओकाबोका आणि केविलवाणा दिसू लागला. आता नेहमीची पालवी दिसणार नव्हती आणि फुलं यायला तर काही वर्ष लागणार होती. 

पण माणूस आशेवर जगत असतो नं ! निसर्गाने झाडांना बहाल केलेला रीजनरेशनचा गुण कामी येऊन काही दिवसांनी एकीकडची फांदी हिरवाईनं पुन्हा नटली. आणि बहाव्याच्या खोडाच्या टोकावर बुलबुलांची जोडी, सूर्यपक्षी येऊन बसू लागले. एकदा तांबटही मिनिटभर विश्रांती घेऊन गेला.


काही महिन्यांपूर्वी करवतीने कापलेला बहावा आज परत नेटाने उभा राहिला आहे. ते पांढरं खोड असलेलं  झाड पाना-फुलांनी परत बहरेल हे मात्र नक्की.





आमचा बहावा



बहाव्याचा फुलोरा




Photo Credits
https://pixabay.com/photos/dok-khoun-cassia-fistula-flower-5196009/
https://pixabay.com/photos/cassia-fistula-summer-yellow-3676621/




13 comments:

  1. अप्रतिम लेख! अतिशय सुंदर, मनाला भिडणारी भाषा शैली! 👌👌

    ReplyDelete
  2. Thank you so much Tai for your appreciation.

    ReplyDelete
  3. अप्रतिम लेख मनाला भावणारा

    ReplyDelete
  4. खूपच छान जसा मनमोहक बहावा तसेच मनाला मोहून टाकणारा लेख

    ReplyDelete
    Replies
    1. Thank you so much Shubhangi for reading and commenting.

      Delete
  5. This comment has been removed by the author.

    ReplyDelete
  6. What a sweet, gentle and sensitive account. Loved it. Keep writing Medha. 🌹❤

    ReplyDelete
  7. Thank you so much dear Deepa for taking the time to read and to comment.

    ReplyDelete
  8. Loved it dear Medha so beautifully written

    ReplyDelete
  9. Thank you so much dear Shanti. Truly appreciate your words

    ReplyDelete