कालची सकाळ खूपच उदासवाणी उगवली. आकाशभर मळभ साचलं होतं. सकाळची कोवळी उन्हं लपून बसली होती. त्यांना ही कंटाळा आला होता बहुतेक , रात्रीच्या पांघरुणातून बाहेर पडण्याचा. थंडगार वारा वाहत होता.
दुसरा शनिवार असल्याने रस्ता ही सुस्तावून पडला होता. क्वचित एखादी दुचाकी जाण्याचा काय तो आवाज.
सकाळचा माझा चहा संपवून मी रोजच्या कामाला लागले. चहाचा मग विसळताना सहज समोरच्या खिडकीतून बाहेर पाहिलं तर बहाव्याच्या सुकलेल्या, निष्पर्ण फांद्यांवर रोज दिसणारी बुलबुल पक्षांची जोडी बसली होती. त्यांची लाडीक शीळ ऐकून नकळत माझे ओठ हसले. हे ही रोजचंच.
तेवढ्यात भुर्रकन उडून एक छोटुकला पक्षी बहाव्यावर येऊन बसला. इतकी वर्षं ज्याचा फक्त आवाज कानावर पडत होता, तो तांबट माझ्यासमोर होता. त्याचा काळपट हिरवा रंग, डोळ्याभोवती लाल पिवळ्या रंगाचे वर्तुळ, गळ्यावर छोटासा लाल बो, अशा गूगलवर पाहिलेल्या खुणा दिसल्यावर ओळखलाच मी त्याला. जेमतेम अर्धा मिनिट टिकला तिथे पण माझ्या मनातल्या कोपऱ्यात रेंगाळणारी उदासी दिवसभरासाठी घालवून.
शाळकरी वयात जेव्हा कॉपरस्मिथ हा शब्दही माहिती नव्हता तेव्हापासूनचं नातं आहे त्याच्याशी. एखाद्या शांत, संथ दुपारी परिक्षेचा अभ्यास करताना कानावर पडायचा त्याचा कुक, कुक, कुक असा आवाज. न थांबणारा, सतत. मान दुखेपर्यंत पानांच्या गर्दीत शोधून देखील सापडायचा नाही बेट्या. पण अभ्यास करताना रोज सोबत मात्र करायचा.
खूप वर्षांनी तो कॉपरस्मिथ अथवा तांबट आहे हे समजले. किती वेगवेगळ्या तऱ्हेने निसर्गाशी जोडले गेलो असतो न आपण. आणि त्यातून मिळणाऱ्या आनंदाशी सुध्दा. गरज आहे ती फक्त हे ओळखण्याची.
Image credit:https://ebird.org/species/copbar1
Beautifully written
ReplyDeleteThank you Madhavi.
Deleteखूप मस्त !!
ReplyDeleteVery beautiful
ReplyDeleteThank you Shanti
Deleteसुरेख.किती छान अभिव्यक्त होता येत तुला.
ReplyDeleteThank you so much.
ReplyDelete